पुणे : थीमनुसार सजावटीच्या साहित्याची खरेदी; बाजार गर्दीने फुलला! | पुढारी

पुणे : थीमनुसार सजावटीच्या साहित्याची खरेदी; बाजार गर्दीने फुलला!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वैविध्यपूर्ण सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली असून, नानाविध प्रकारचे सजावटीचे साहित्य बाजारात आले आहे. यंदा थीमनुसार नागरिक सजावटीचे साहित्य खरेदी करीत आहेत. आर्टिफिशल फुले, फुलांचे-मोत्यांचे तोरण, रंगीबेरंगी पडदे, मल्टीकलर एलईडी दिवे, झिरमिळ्या, कलरफुल वॉल हँगिंग, कलरफुल कागद आदी प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि कॅम्प परिसरात खरेदीसाठी गर्दी होत आहे.

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरल्याने आपल्याला हवे तसे आणि थीमनुसार सजावटीचे साहित्य घेतले जात आहे. त्यात वेगवेगळ्या रंगांनुसार थीम, काल्पनिक मंदिराची प्रतिकृती, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांवर आधारित थीम, फुलांची सजावट आणि वेगवेगळ्या वास्तूंची प्रतिकृती यांचा समावेश आहे. गणपतीसाठी आसन, पडदे, झिरमिळ्या, फुले, दिवे, आर्टिफिशयल रांगोळी असे सर्व काही खरेदी केले जात आहे. त्यात पर्यावरणपूरक सजावटीचे साहित्य आहे. कागदाची फुले, झिरमिळ्या आदी वस्तूही दिसून येतात.

गणपती शेला, पणत्या, मल्टीकलर शेडसह फुलांचे विविध प्रकारही आहेत. सजावटीच्या साहित्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. खरेदीला आलेल्या प्राजक्ता आकिवाटे म्हणाल्या, ‘सजावटीच्या साहित्यात थीमप्रमाणे खरेदी केली. वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची सजावट यंदा करणार आहे. आर्टिफिशिल फुलांमध्ये असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. तसेच काही पर्यावरणपूरक सजावटीचे साहित्यही आहे. यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याने लोक वेगवेगळया थीमप्रमाणे सजावट करण्यावर भर देत आहेत.’

 

 

 

Back to top button