पुणे : सात हजार गणेशमूर्ती वाटणारा अवलिया; दहीहंडीवरचा खर्च वाचवून देतोय श्रींच्या मूर्ती | पुढारी

पुणे : सात हजार गणेशमूर्ती वाटणारा अवलिया; दहीहंडीवरचा खर्च वाचवून देतोय श्रींच्या मूर्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात चौकाचौकांत गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत. मात्र, रविवार पेठेत असा एक मंडप दिसला, जेथे मूर्ती निवडल्यानंतर त्याची किंमत भाविकांनीच ठरवायची आहे. शहरातील एका अवलियाने हे अवघड शिवधनुष्य उचलले आहे. यंदा ‘दहीहंडीवरचा खर्च वाचवून तब्बल 7 हजार मूर्ती’ या उपक्रमाद्वारे घरोघरी प्राणप्रतिष्ठेसाठी दिल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षांत शहरातील कोरोनाकाळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. त्यावेळी गणेशोत्सव साजरा करायलाही अनेकांजवळ पैसे नव्हते.

कुटुंबप्रमुखासह घरातील बाळगोपाळांची सुंदर आकर्षक व मोठी मूर्ती बसविण्याची इच्छा असते. ही तगमग हेरून प्रल्हाद गवळी या मनसेच्या कार्यकर्त्याने दोन वर्षांपासून ‘घरचा गणपती बाप्पा’, ‘मूर्ती आमची, ऐच्छिक देणगी तुमची’ हा उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. पुणेकरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि अनेकांनी आपल्या लहान मुलांसह येऊन येथून मूर्ती आपल्या घरी नेल्या. या ठिकाणी ठेवलेल्या हंड्यात भाविक त्यांच्या इच्छेनुसार रक्कम टाकतात.

या वर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविताना गवळी यांनी चार-पाच महिन्यांपूर्वीच नियोजन केले. दहीहंडी भव्य प्रमाणात साजरी न करता तो खर्च त्यांनी वाचविला. स्वतःचे पंचवीस लाख रुपये खर्चून त्यांनी सात हजार मूर्ती तयार करण्यास मूर्तिकारांना सांगितले. लाल माती, साधी माती, मुलतानी माती, शाडू आणि पीओपी अशा विविध स्वरूपाच्या विभिन्न रूपातील आकर्षक रंगसंगतीच्या गणेशमूर्ती या मांडवात विराजमान झाल्या आहेत. या मूर्तींची मूळ किंमत 175 ते 1500 रुपये असली, तरी भाविक त्यांना आवडणारी मूर्ती घेतल्यानंतर ऐच्छिक देणगी हंडीत टाकतात.

‘गणपती आमचा, किंमत तुमची’
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी ‘गणपती आमचा, किंमत तुमची’ या उपक्रमाचे उद्घाटन केले. तेथून भाविक रांगा लावून मूर्ती घेऊन जात आहेत. हरितालिकेनिमित्त हरितालिकेच्या मूर्ती व वाळू महिलांनी रांगा लावून नेत असल्याचे दृश्य गेले दोन दिवस दिसत आहे.

 

Back to top button