हगणदरीमुक्त नांदेडमध्ये पालिकेची स्वच्छतागृहे बंद; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

हगणदरीमुक्त नांदेडमध्ये पालिकेची स्वच्छतागृहे बंद; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: कष्टकरी मजुरांचे वास्तव्य असलेल्या मुख्य सिंहगड रोडवरील नांदेड येथील ग्रामपंचायत काळातील हगणदारीमुक्त जेपीनगर वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद पडली आहेत. स्वच्छतागृहे बंद पडल्यामुळे येथील शेकडो रहिवाशांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे. ग्रामपंचायत काळात स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता सुरू होती. महापालिकेत समावेश झाल्यापासून स्वच्छतागृहांच्या पाणी, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. पाणी, स्वच्छता नसल्याने स्वच्छतागृहांची दुर्दशा झाली आहे. दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहांची दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जेपीनगर वसाहतीत जवळपास पाचशे कुटुंबे आहेत. तीन हजारांवर लोकसंख्या आहे. बहुतांश घरात स्वच्छतागृहे नाहीत, त्यामुळे नांदेड ग्रामपंचायतीने पुरुष व महिलांसाठी दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी केली. 25 खोल्या पुरुषांसाठी व 15 खोल्या महिलांसाठी आहेत. शौचालय असल्याने बहुतांश रहिवासी सार्वजनिक स्वच्छता गृहांवर अवलंबून आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये महापालिकेत नांदेडचा समावेश झाला, तेव्हापासून स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती ठप्प झाली. पाणी नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे स्वच्छतागृहांचा वापरही बंद झाला आहे.

अनेक घरांत तसेच प्राथमिक शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य हणुमंत शिऊर म्हणाले, “वांरवार विनंत्या करूनही पालिकेने स्वच्छता गृहांकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छतागृहे बंद असल्याने महिला, नागरिकांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पालिकेच्या सिंहगडरोड क्षेत्रिय विभागाने स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेची दखल घेऊन आरोग्य निरीक्षकांना पाहणी करून काही तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वच्छतागृहांत पुरेसे पाणी तसेच दुरुस्ती करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

Back to top button