

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा: पुण्याची वाटचाल 'स्मार्ट शहर, स्वच्छ शहर'कडे होत असताना पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव दिसत आहे. त्यामुळे येथील परिसर अस्वच्छतेबरोबरच रहिवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. पुणे शहरालगतच्या फुरसुंगी, शेवाळवाडी, उरुळी देवाची, औताडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेला आहे.
मोठी लोकसंख्या असलेली फुरसुंगी, उंड्री, उरुळी देवाची या गावांचा समावेश होऊन चार वर्षे उलटली आहेत, मात्र अद्यापही या गावांत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. फुरसुंगीसारख्या गावाची लोकसंख्या सुमारे लाखाच्या आसपास आहे, तसेच इतर भागांतही झालेल्या नागरीकरणामुळे त्या-त्या गावांची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या गावांमध्ये एखाददुसरा अपवाद वगळता सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे.
बहुतांश ठिकाणी सार्वजनिक मुतार्याच उभारण्यात न आल्यामुळे सार्वजनिक शौचालयाची गोष्ट तर खूपच दूर आहे. ज्या काही एक-दोन ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे, त्या स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे. स्वच्छता नसल्यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर होत नाही, तसेच येथील नळ, बादली, दरवाजे, वीजसाहित्य चोरीस गेल्यामुळे या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायतींनी आर्थिक अडचणीअभावी रहिवाशांना इतर सुविधा पुरवताना या आरोग्याच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष केले.
मात्र, पुणे महानगरपालिका सक्षम असतानाही या गावांमध्ये नव्याने कोठेच सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात आलेली नाहीत. अद्यापही नैसर्गिक विधीसाठी येथील नागरिकांकडून मोकळ्या जागा, आडोश्याचा वापर होताना दिसतो. काही कुटुंबाकडून शौचालये बांधली असतानाही वापरली जात नसून, संबंधितांकडून मोकळ्या जागेचा शौचासाठी वापर होताना दिसत आहे. गावामध्ये विविध उत्सव, समारंभ, व्यवसाय, बाजार विविध कारणामुळे लोक ये-जा करीत असतात, मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावी त्यांना आडोश्याचा आसरा घ्यावा लागत आहे. यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत आहे.