पुणे; पुढारी वृत्तसेवा: तब्बल दोन वर्षांनंतर पुण्यात गणेशोत्सव यंदा मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून 800 ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या पीएमपी नियोजित वेळापत्रक वगळून दोन टप्प्यात सोडणार आहे. गणेशोत्सवानिमित्त पुणे शहराबाहेरून गणपती देखावे पहाण्यासाठी येणार्या नागरिकांची मोठी गर्दी असते. परिणामी पीएमपीच्या गाड्यांनाही मोठी गर्दी होते. त्यापार्श्वभूमीवर पीएमपी दरवर्षी ज्यादा गाड्यांचे नियोजन करते. यंदाही पीएमपीने 800 ज्यादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
असे आहे गाड्यांचे नियोजन
पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यात 1, 2, 8 तारखेला रात्री 156 ज्यादा गाड्या धावणार आहेत. या गाड्यांद्वारे पुणे शहरात सेवा पुरविली जाणार आहे.
दुसरा टप्पा : दुसर्या टप्प्यात 3 ते 7 आणि 9, 10 तारखेला 654 ज्यादा गाड्या शहरात रात्रीच्या वेळी प्रवासी सेवा पुरविणार आहेत.
पिंपरी-चिंचवडला 266 बस
गणेशोत्सव काळात पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडकरितासुद्धा ज्यादा 266 बसचे नियोजन करण्यात येणार आहे. या 266 गाड्या फक्त पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव काळात रात्रीच्या वेळी सेवा पुरवतील, असे पीएमपीकडून सांगण्यात आले आहे.
रात्री 10 नंतर 5 रुपये तिकीट वाढ
पीएमपीचे दिवसा जेवढे तिकीट एखाद्या मार्गावर असेल, त्याच मार्गावर रात्री 10 नंतर गणेशोत्सव काळात पीएमपी बसचे तिकीट 5 रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रात्री काही प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडणार आहे. तसेच, रात्री 12 नंतर पीएमपीचे सर्व मोफत पास बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पासधारकालादेखील तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे.