नगर : सजावटीच्या साहित्याने मंचर बाजारपेठ गजबजली | पुढारी

नगर : सजावटीच्या साहित्याने मंचर बाजारपेठ गजबजली

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : मंचर (ता. आंबेगाव) बाजारपेठ गणेशोत्सवातील सजावटीच्या व पूजेच्या साहित्याने गजबजली आहे.
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपल्याने मंचर (ता. आंबेगाव) येथील आठवडे बाजारात सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रविवारी (दि.28) मोठी गर्दी केली.

यंदा बुधवारी (दि. 31) रोजी गणपतींचे आगमन होणार आहे. मंचर बाजारपेठेत यंदा प्लास्टिक व थर्माकोलऐवजी पर्यावरणपूरक घरगुती पद्धतीने तयार केलेली कृत्रिम रंगीबेरंगी फुले, कापड व बांबूपासून तयार केलेल्या सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी बाजारपेठ, लक्ष्मी रस्ता या भागांत सजावटीच्या साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली आहेत. या बाजारपेठेतील कृत्रिम पद्धतीने तयार केलेली झेंडू, जास्वंदी, मोगरा, अशा अनेक विविध आकारांतील रंगीबेरंगी कापडी फुलांचे हार लक्ष वेधून घेत आहेत. सजावटीच्या दुकानांमध्ये चंदनहार, फुलदाणी, मोती व काचेपासून बनवलेली लटकन, कापडी पडदे व लाकडी बांबूपासून तयार केलेल्या कमानी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवाला अवघा एक दिवस उरल्याने रविवारी (दि.28) या ठिकाणी मंचर बाजारपेठेत मोठी गर्दी होती व सजावट व पूजेच्या साहित्याची खरेदी केली. गेली सलग दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर मोठ्या प्रमाणात निर्बंध होते. परंतु, यंदा मात्र कोरोनाचे संकट नसल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेत झालेल्या गर्दीवरून दिसून आला.

Back to top button