पिंपरी : कांद्याची आवक निम्म्याने घटली; दर मात्र स्थिर | पुढारी

पिंपरी : कांद्याची आवक निम्म्याने घटली; दर मात्र स्थिर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोशी उपबाजार समिती आणि पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत कांद्याची आवक निम्म्याने घटली आहे. तरीही, दर मात्र स्थिर आहेत. फ्लॉवर, कोबी यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. तरीही फ्लॉवरचे दर स्थिर आहेत. वांग्याची दुप्पट आवक झाली आहे. त्यामुळे काटेरी वांग्याचे दर किलोमागे 10 रुपयांनी कमी झाले आहेत. मटारची आवक कमी झाली असली, तरी प्रति किलोमागे सरासरी 10 रुपयांनी दरात घट झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.
सध्या पालेभाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

किरकोळ बाजारात शेपू, पुदिना, मुळा यांचे दर दुपटीने वाढले आहेत. तर, पालकच्या दरात घट झाली आहे. काकडी, कारली, वांगी यांच्या दरात प्रति किलोमागे सरासरी 10 रुपयांची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याची आवक 468 क्विंटल होती. त्या तुलनेत रविवारी मोशी उपबाजारात केवळ 230 क्विंटल कांद्याची आवक झाली. म्हणजे जवळपास निम्म्याने आवक कमी झाली आहे. मात्र, त्यामुळे दरावर परिणाम झालेला नाही. बटाट्याची आवक 589 क्विंटल इतकी झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 276 क्विंटलने आवक घटली आहे. गेल्या आठवड्यात 865 क्विंटल इतकी आवक झाली होती.

मोशी उपबाजारात वांग्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. गेल्या आठवड्यात 53 क्विंटल इतकीच आवक होती. त्या तुलनेत रविवारी 112 क्विंटल इतकी आवक झाली. गेल्या आठवड्यात फ्लॉवर 104 क्विंटल, तर कोबी 97 क्विंटल इतकी आवक झाली होती. तर, रविवारी 126 क्विंटल फ्लॉवर आणि 131 क्विंटल कोबीची आवक झाली. फ्लॉवर आणि कोबीचे दर स्थिर आहेत.

पालेभाज्यांची 31 हजार 400 गड्डी आवक
घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथीची गड्डी प्रत्येकी 18 रुपये, कांदापात प्रत्येकी 13 रुपये दराने गड्डी विकली गेली. शेपू 8 रुपये, मुळा 10 रुपये आणि पालक 7 रुपये, तर, पुदिना 6 रुपये गड्डी या दराने विक्री झाली. किरकोळ बाजारात टोमॅटोला 20 रुपये किलो, तर काकडीला 30 रुपये किलो इतका भाव होता. फळभाज्यांची आवक 2 हजार 325 क्विंटल, फळांची आवक 262 क्विंटल इतकी झाली. तर, 31 हजार 400 गड्डी इतकी पालेभाज्यांची आवक झाली

Back to top button