पुणे : गणेशोत्सवामुळे फळांना मागणी | पुढारी

पुणे : गणेशोत्सवामुळे फळांना मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पूजेसाठी मार्केट यार्डातील फळबाजारात फळांना मागणी होऊ लागली आहे. परिणामी, बहुतांश फळांच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत आवक कमी पडल्याने डाळिंब, पेरू व सीताफळाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कलिंगडाचे भाव किलोमागे दोन, तर खरबूज व पपई पाच रुपयांनी वधारले आहेत. बाजारात लिंबालाही चांगली मागणी असून, भावात 15 किलोंच्या गोणीमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक-जावक कायम असल्याने फळांचे भाव टिकून आहेत.

रविवारी (दि. 28) मार्केट यार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, संत्री 12 ते 15 टन, मोसंबी 70 ते 80 टन, डाळिंब 40 ते 45 टन, पपई 10 ते 12 टेम्पो, लिंबे सुमारे 1 हजार ते 1200 गोणी, पेरू 800 ते 900 के्रटस्, कलिंगड 4 ते 5 गाड्या, खरबूज 5 ते 6 गाड्या, सीताफळाची आठ ते दहा टन इतकी आवक झाली..

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 600-800, अननस : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 120-220, (4 डझन) : 60 ते 130, संत्रा : (10 किलो) : 300-800, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 40-150, गणेश : 10-50, आरक्ता 20-80. कलिंगड : 6-10, खरबूज : 15-25, पपई : 15-35, पेरू (20 किलो) : 300-500, चिक्कू (10 किलो) : 100-500, सिताफळ : 20-150, सफरचंद (25 ते 30 किलो) : 1800-3000 .

 

Back to top button