दापोडी : बाप्पांच्या आगमनाची घराघरात तयारी | पुढारी

दापोडी : बाप्पांच्या आगमनाची घराघरात तयारी

दापोडी : गणपती बाप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या…., अशी आर्त हाक देत मागील वर्षी गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशोत्सवाची वाट बघणार्‍या भक्तांच्या लाडक्या बाप्पांचा उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सांगवी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भाविक तयारीला लागलेले आहेत. सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यासारखे असतात. घरातील स्वच्छता व मंडळ परिसर स्वच्छता युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, अत्यावश्यक कामे व सुविधांची पुर्तता करण्यात येत आहे.

अगदी मूर्ती बनवणार्‍या कारागिरापासून ते गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि घरात चिमुकली मंडळीदेखील तयारीत गुंतलेले दिसत आहेत. मूर्तिकार शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत. तर, मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणीच्या कामांना वेळ घालण्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

सजावटीच्या कामांना आला वेग

घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे बुधवारी (दि. 31) वाजत-गाजत आगमन होणार असल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे. ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यासाठी तयारी प्रामुख्याने मोठ्या मंडळाची सुरू आहे. प्रतिष्ठापनेसाठी सार्वजनिक मंडळाच्या सजावटीसाठीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या मंडळाकडून रात्र दिवस सजावटीचे काम सुरू आहे.
बाप्पांच्या आगमनाची सर्वांना ओढ लागली असून, स्वागतासाठी सारे जण तयारीला लागले आहेत. यात सर्वांत जास्त लगबग ही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची वाढलेली पाहण्यास मिळत आहे. भाविकांना आकर्षित करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या देखाव्याचे काम पूर्ण करण्यात कारागीरदेखील व्यस्त असल्याचे दिसत आहे. शिवाय दहा दिवसांच्या उत्सवात लागणार्‍या सार्‍या वस्तूंची जमवाजमव करणे, भटजी, मंडप, साऊंड सिस्टम याची बुकिंग यापूर्वीच झाली आहे.

Back to top button