पिंपरी : ट्रान्सपोर्ट्सच्या निवडणुकीत गैरकारभार, सदस्यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार | पुढारी

पिंपरी : ट्रान्सपोर्ट्सच्या निवडणुकीत गैरकारभार, सदस्यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

पिंपरी : निगडी येथील असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट्सच्या 2021-22 च्या कमिटीत गैरव्यवहार झाला आहे. मर्जीतील उमेदवार विजयी करण्यासाठी नियमांची पायमल्ली करण्यात आली, अशी तक्रार असोसिएशन बचाव कमिटीचे अध्यक्ष रवी खन्ना व सदस्य जयवंत जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या वेळी अरूण शर्मा, बनवारी आगरवाल व अन्य सदस्य उपस्थित होते.

खन्ना व जाधव यांनी सांगितले, की असोशिएशनची निवडणूक 20 वर्षांनंतर 30 ऑक्टोबर 2021 ला झाली. त्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी दोन निवडणूक अधिकारी नियुक्त केले होते. या अधिकार्‍यांशी संगनमत करून सरसकट 2 हजार रूपये घेऊन थेट सदस्यत्व देण्यात आले. त्यांना मतदानांचा अधिकार बहाल करण्यात आला. जमा झालेल्या रक्कमेचा कोणताही हिशोब ठेवण्यात आलेला नाही. या संदर्भात चौकशी करण्याची तक्रार या पूर्वीच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

एकूण 402 पैकी 344 जणांनी मतदान केले असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एका मतपेटी 200 आणि दुसर्‍या मतपेटीत 144 मते होती. त्यात 5 सदस्य निवडून आले. त्यांना प्रत्येकी 200 मते मिळाली. मतपेट्या बदलण्यात आल्या. मतमोजणीच्या वेळी पोलिंग एजंटला उपस्थित राहू दिले नाही, अशी तक्रार रवी खन्ना यांनी
केली आहे.

पूर्वपरवानगी न घेता केली कामे
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कोणतीही पूर्वपरवानगी न घेता असोसिएशनच्या कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली. कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी असोसिएशनच्या खात्यातून दरमहा 10 हजार रुपये काढले जात आहेत. तसेच असासिएशनच्या घटनेत मर्जीनुसार विविध बदल परस्पर करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द करून नियमानुसार निपक्ष:पातीपणे निवडणूक घेण्यात यावी आणि निवडणूक दर पाच वर्षांनी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button