शिक्रापुरात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; वाढदिवसाला श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवण्याची मित्रांवर वेळ | पुढारी

शिक्रापुरात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; वाढदिवसाला श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवण्याची मित्रांवर वेळ

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा येथे पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणार्‍या युवकाचा अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाला. शुभम दत्तात्रय दिवेकर (वय 23, रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर; मूळ रा. भांडगाव, ता. दौंड) असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर येथे राहणारा शुभम दिवेकर शनिवारी रात्रीच्या सुमारास मलठण फाटा येथे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. नागरिकांनी त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा उपचारांपूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत रवींद्र केशव शिवले (रा. वढू बुद्रुक, ता. शिक्रापूर) यांनी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

दुर्दैवी वेळ
शिक्रापूर येथील अपघातात मयत झालेला शुभम दिवेकर याचा 26 ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. त्या वेळी सर्व मित्रपरिवाराने वाढदिवस शुभेच्छा देत स्टेटस ठेवले होते. मात्र, दोनच दिवसांत मित्रांना शुभमच्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button