पिंपरी : गुलछडीचे दर तिपटीने वाढले | पुढारी

पिंपरी : गुलछडीचे दर तिपटीने वाढले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गुलछडी फुलाचे दर तीन दिवसांत तिपटीने वाढले आहेत. अन्य फुलांचे दर मात्र स्थिर आहेत. गणेशोत्सव काळात या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता फूल विक्रेत्यांनी वर्तविली आहे. फुलांचे हार बनविण्यासाठी गुलछडीच्या फुलांना चांगली मागणी असते. गुलछडीच्या फुलांची पिंपरी बाजारपेठेत चांगली आवक झाली आहे.

तीन दिवसांपूर्वी गुलछडीची फुले 200 रुपये किलोने विकली जात होती. त्याच फुलांचे दर आज 600 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहचले होते. झेंडू, शेवंती, गुलाब, जरबेरा, आर्केड आदी फुलांचे दर सध्या स्थिर आहेत. फुलांचे हार 20 रुपये ते 2 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गणेशोत्सवासाठी त्यांची आगाऊ नोंदणी सुरु आहे.

कृत्रिम हारालाही मागणी
गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाला करण्यात येणार्‍या आकर्षक सजावटीसाठी कृत्रिम फुलांचे हार देखील नागरिकांकडून खरेदी केले जात आहेत. त्याशिवाय, सुट्ट्या कृत्रिम फुलांची देखील नागरिकांकडून खरेदी सुरू होती.

फुलांचे दर (प्रतिकिलो)
झेंडू 80
कापरी झेंडू 80
भगवा झेंडू 60
शेवंती 120
पिवळी शेवंती 200
अ‍ॅस्टर 200
गुलाब 400
गुलाब गड्डी (20 फुले) 200
गुलछडी 600
जरबेरा गड्डी (10 फुले) 200
आर्केड गड्डी 600

 

Back to top button