पुणे : हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना मागणी

उकडीचे मोदक तयार करताना महिला.
उकडीचे मोदक तयार करताना महिला.

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बाप्पाच्या आगमनाचा दिवस म्हटल्यावर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य आलाच… सध्या पुणेकरांकडून हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात दहाही दिवस नैवेद्यासाठी, प्रसादासाठी व्यावसायिकांकडे मोदकांसाठी विचारणा सुरू झाली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे आणि घरगुतीस्तरावर असे मोदक तयार करणार्‍या व्यावसायिक महिलाही कामाला लागल्या आहेत.

हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करण्याचा व्यवसाय गणेशोत्सवात अनेक महिला करतात. घरगुतीस्तरावर त्या हा व्यवसाय करतात. सध्या काही नव्या आणि काही जुन्या महिला व्यावसायिक आपले कौशल्य वापरून हे मोदक तयार करीत आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मोदकांना मागणी आहे. यंदा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुमारे 50 हजार हून अधिक मोदक तयार होतील, असे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'सोमवारी (दि.29) मध्यरात्रीपासून हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करण्यास व्यावसायिक सुरुवात करतील. त्यासाठीच्या सारणाची तयारी शनिवारपासूनच सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी खासकरून मोदकांना मागणी असते आणि यासाठी ऑर्डर व्यावसायिकांकडे नोंदवण्यात आली असून, घरगुती व्यावसायिक कामाला लागले आहेत. या वर्षी महिला व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. या वर्षी आम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणात उकडीचे मोदक तयार करणार असून, लोकांकडून ऑर्डरही तशा आल्या आहेत.'

कौशल्याचे काम…
हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करणे कौशल्याचे काम आहे. मोदक हा गणेशोत्सवातील महत्त्वाचा भाग आहे. अनेक महिला व्यावसायिक आणि कर्मचारी मेहनत करून मोदक बनवतात. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री हे मोदक तयार केले जातात आणि गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत ते घराघरात पोचविले जातात. एका मोदकाची किंमत 25 ते 30 रुपये असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news