गणेशोत्सवासाठी पुण्यात दोनच सुट्या; मुंबईत मात्र पाच दिवस | पुढारी

गणेशोत्सवासाठी पुण्यात दोनच सुट्या; मुंबईत मात्र पाच दिवस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात 31 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. गणेशोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांना साजरा करता यावा यासाठी मुंबईत शाळा- महाविद्यालयांना पाच दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर पुण्यात मात्र गणपती आगमनाची आणि विसर्जनाचीच सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सारखाच साजरा होत असताना सुट्यांबाबत भेदभाव का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

विद्यार्थी व पालकांचे गावाला जाण्याचे नियोजन आहे, यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना पाच दिवस सुटी जाहीर करावी, तसेच या काळात कोणत्याही, परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबईत शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. याबाबतची मागणी विद्यार्थी संघटनांसह राजकीय संघटनांनी केली होती. राज्यात गणपती उत्सवाची मुहूर्तमेढ पुणे शहरात रोवली गेली आणि मग हा उत्सव राज्यातच नव्हे तर देशभर पसरला.

त्याच पुण्यात गणपती उत्सव चांगला साजरा केला जावा यासाठी पाच दिवस सुटी दिली गेली नाही. मात्र, मुंबईत ही सुटी पाच दिवस दिली गेली आहे. यासंदर्भात पुण्यातील शाळांमधील शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गणपती उत्सवाची सुटी नेमकी किती दिवस, याचे कोणतेही परिपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले नसल्यामुळे या संभ्रमात आणखी भरच पडली आहे. या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी गणपती आगमन आणि गणपती विसर्जन अशा दोनच सुट्या असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या सुट्यावरून भेदभाव नेमका कशासाठी असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.

Back to top button