पुणे : फ. मुं. शिंदे यांनी अस्वस्थता टिपत राहावे; शरद पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : फ. मुं. शिंदे यांनी अस्वस्थता टिपत राहावे; शरद पवार यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘फ. मुं. संवेदनशील साहित्यिक असून, समाजातील सभोवतालचे वातावरण पाहून त्यातील अस्वस्थता टिपणारा हा साहित्यिक आहे. त्यामुळे समाजातील अस्वस्थता टिपण्याचे काम फ. मुं. शिंदे यांनी कायम ठेवावे,’ अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. फ. मुं. शिंदे मित्रमंडळ आणि परिवाराच्या वतीने फ. मुं. शिंदे यांचा अमृतमहोत्सव समारंभ आणि ‘फ. मुं. शिंदे : खंड 2’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) झाले, त्या वेळी ते बोलत होते.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, समीक्षक विश्वास वसेकर, सुनील महाजन, फ. मुं.च्या पत्नी लीला आणि कन्या ऋचा तसेच सचिन इटकर या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘देशातील सध्याची बदलती परिस्थिती पाहून फ. मुं. शिंदे अस्वस्थ होत असतील. त्याचबरोबर समाजातील एक वर्ग वंचित राहत असल्याबाबतची अस्वस्थता त्यांच्या लेखणीतून उतरत असते.’

या प्रसंगी फ. मुं. शिंदे म्हणाले की, एक साहित्यिक राजकारणाकडे पाहण्याची आमची वेगळी दृष्टी आहे. उपरोधिक टिप्पण्या करून आम्ही समाजाची स्पंदने मांडत असतो.’ या वेळी त्यांनी ‘आई’ ही त्यांची प्रसिद्ध कविता सादर केली. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.

जातीपातीच्या पलीकडे जाऊन भूमिका घेतली
फ. मुं. शिंदे म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन एक ठोस भूमिका घेऊन साहित्यविश्वात आणि समाजात वावरणारा साहित्यिक आहे. मराठा समाजाचे असूनही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात फ. मुं. अग्रस्थानी होते, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

Back to top button