पुणे : कश्मीरच्या उपक्रमात आमचा सहभाग नाही; दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा खुलासा | पुढारी

पुणे : कश्मीरच्या उपक्रमात आमचा सहभाग नाही; दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा खुलासा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील सात गणेश मंडळे पुढील वर्षी जम्मू कश्मिरात दीड दिवसांचा गणेशोत्सव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाला मात्र आमचा पाठिंबा नाही. यात आम्ही सहभागी होणार नसल्याचा खुलासा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी केला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुढील वर्षी 2023 मध्ये पुण्यातील सात गणपती मंडळे हे जम्मू-काश्मीर येथील विविध जिल्ह्यांत किमान दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणार आहेत, अशी घोषणा शनिवारी (दि.27) रोजी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याबाबत दगडूशेठ गणपती ट्रस्टने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, या उपक्रमाला आमचा पाठिंबा नाही. कारण, या उपक्रमात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर आणि मंदिर खूप संवेदनशील भाग आहे. या उपक्रमाची घोषणा करण्यात आली, त्याबद्दल आम्ही पूर्णपणे अनभिज्ञ आहोत.’

‘कार्येकर्ते कामात व्यग्र असल्याने आमच्यातील कोणी पत्रकार परिषदेला गेले नव्हते. ही घोषणा अचानक करण्यात आली आणि याची आधी कल्पना देण्यात आली नव्हती. या घोषणेचा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी आहे. अष्टविनायक मंडळांच्या सामाजिक उपक्रमांत आमचा सहभाग आहे, पण या उपक्रमात आमचा सहभाग नाही,’असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button