निरा : आर्थिक साक्षर अभियानात उघडली 351 खाती: खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती | पुढारी

निरा : आर्थिक साक्षर अभियानात उघडली 351 खाती: खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

निरा; पुढारी वृत्तसेवा: कुटुंबातील प्रत्येक महिला आर्थिक साक्षर व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खेडोपाड्यातील महिला आर्थिक साक्षर होण्यासाठी अभिनव योजना आखली आहे. या अभियानात जिल्हा बँकेच्या निरा शाखेत 351 खाती उघडण्यात आल्याची माहिती बारामतीच्या खा. महासंसदरत्न सुप्रिया सुळे यांनी दिली. निरा (ता. पुरंदर) येथे बुधवारी (दि. 24) नाबार्ड बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निरा शाखा व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी खा. सुप्रिया सुळे बोलत होत्या.

या वेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी आ. अशोक टेकवडे, माणिकराव झेंडे, दत्तात्रय चव्हाण, विजय कोलते, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, रेखा चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, गौरी कुंजीर, जिल्हा बँकेचे निरा शाखेचे विकास अधिकारी मयूर भुजबळ, शाखाधिकारी सुहास शेलार यांंच्यासह बचत गटातील बहुसंख्य महिला, बँकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा बँकेत खात्याविषयीची माहिती बँकेचे आर्थिक साक्षरतेचे समन्वयक सुजित शेख यांनी पथनाट्य व चित्रफितीद्वारे जनजागृती करीत उपस्थित महिलांना माहिती दिली. जिल्हा बँकेतील निरा शाखेत आर्थिक साक्षरता अभियानांतर्गत 351 महिलांनी नवीन बचत खाती उघडली. त्यापैकी काही महिलांना एटीम कार्ड, बँक पासबुक व विम्याचे प्रमाणपत्र खा. सुळे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच, महिलांच्या प्रश्नांना खा. सुळे व बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन जयेश गद्रे यांनी केले. सरपंच तेजश्री काकडे यांनी आभार मानले.

Back to top button