पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियमन करीत असलेल्या पोलिसाला कारने 800 मीटर अंतर फरफटत नेले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी खंडोबा माळ चौक, आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.
पोलिस नाईक देवराम पारधी (वय 36) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भरत तुकाराम जैद (28, रा. चिंबळी फाटा, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्रवारी सायंकाळी खंडोबा माळ चौक येथे वाहतुकीचे नियमन करीत होते.
दरम्यान, थरमॅक्स चौकातून पांढर्या रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने आली. कारला नंबर प्लेट नव्हती, तसेच काळ्या काचा देखील होत्या. कारचा संशय आल्याने फिर्यादी यांनी कार थांबवण्याचा इशारा केला. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या अंगावर कार घातली. त्यानंतर तब्बल 800 मीटरपर्यंत फिर्यादी यांना फरपटत नेले. निगडी पोलिस तपास करीत आहेत.