मांजरी येथे अडथळ्यांची शर्यत; रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी | पुढारी

मांजरी येथे अडथळ्यांची शर्यत; रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी

मांजरी; पुढारी वृत्तसेवा: मांजरी येथील उड्डाणपूल व रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी. तसेच द्राक्ष बागायतदार संघ सोलापूर रोड ते मांजरी गावठाणदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणही तातडीने करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रवीण रणदिवे म्हणाले, ‘भापकर मळा येथील रेल्वे पुलाखालील अंडरपासचे रुंदीकरण करून सांडपाण्यासाठी मार्ग काढावा. म्हसोबावस्ती ते घुलेवस्तीदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण होणे अपेक्षित आहे.

साडेसतरा नळी ते लोणकरवस्तीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करावे, तसेच तेथे रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल. सोलापूर रोड 15 नंबर ते साडेसतरा नळी यादरम्यानच्या कालव्यावरील, तसेच भापकरमळा ते गोडबोलेवस्ती दरम्यानच्या रंगीच्या ओढ्यावरील रस्त्यांची चांगल्या प्रकारे उभारणी केल्यास अंतर्गत वाहतुकीचा ताण हलका होण्यास मदत होईल.’
घुलेवस्ती येथील कालव्यालगत असलेल्या अरुंद रस्त्याला जाळ्या बसवण्यात याव्यात.

या ठिकाणी आतापर्यंत तीन ते चार लहानग्यांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. कुंजीरवस्ती, तसेच भापकर मळा रोडवरील अनावश्यक गतिरोधक काढण्यात यावेत आणि आवश्यक त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीचे गतिरोधकांची उभारणी करावी. के. के. घुले विद्यालय चौक, तसेच घुलेवस्ती कालव्यावरील चौकातही शास्त्रोक्त पद्धतीचे गतिरोधक बसवावेत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी हायमास्ट दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. घुले विद्यालय चौक ते केशवनगर- मुंढवा दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

मांजरी पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. सेवा रस्त्यांचा पुरेसा पर्याय उपलब्ध नाही. जे आहेत त्यांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
                                        – गणेश मरळ, प्रवीण रणदिवे, ग्रामस्थ, मांजरी

Back to top button