पुणे : व्यावसायिकाकडे सात कोटींची खंडणी | पुढारी

पुणे : व्यावसायिकाकडे सात कोटींची खंडणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देणार्‍या एका कंपनीविषयी बदनामीकारक व्हिडिओ यू-ट्युबवर अपलोड करून धाकाने कंपनीच्या संचालकांकडे 7 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परिजात विमानगर येथील 36 वर्षीय व्यावसायिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमन दुग्गल (वय 28, रा. कोरेगाव पार्क) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 जून 2021 ते 2 जुलै 2022 दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची स्कॉट फिटनेस नावाची कंपनी आहे. त्याचे फिटर नावाचे अ‍ॅप असून त्यावर लोक शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षण घेत असतात. त्यांच्या कंपनीला ड्रीम कॅपिटल व एलिशन पार्क या कंपनीने फंडिग केले आहे. त्यामुळे आरोपी अमन दुग्गल याने फिर्यादी यांच्याबाबत यू-ट्युबवर व्हिडिओ टाकून बदनामी केली. ड्रीम कॅपिटल व एलिशन पार्क या कंपनीने फंडिंग केले असल्याने फिर्यादी यांना त्यांनी अगोदर 4 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

तसा व्हिडिओ यू-ट्युबवर पोस्ट केला. जर पैसे दिले नाही तर हा आकडा वाढत जाईल. जुलैमध्ये 5 कोटी होईल. ऑगस्टमध्ये 6 कोटी आणि सप्टेंबरमध्ये 7 कोटी होतील. ते पैसे तुला माझ्या कंपनीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागतील. ते पैसे दिले नाही तर तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी पैसे न दिल्याने 20 ऑगस्ट रोजी यू-ट्युबवर पुन्हा एक व्हिडिओ अपलोड केला.

त्या व्हिडिओमध्ये फिर्यादीच्या प्रतिष्ठेवर आणि व्यक्तिमत्त्वावर वाईट शब्दात हल्ला केला. अमन दुग्गल याने धमक्या देऊन व्हिडिओ यू-ट्युबवर व इन्स्टाग्रामवर पोस्ट करून खंडणीची मागणी केली आहे. एवढेच नाही तर त्याने फिर्यादीला धमकावण्याठी डॉलचे मुंडके पिरगाळणे, धमकी देणे अशा विविध धमक्या दिल्या आहेत. सतत होणार्‍या प्रकारामुळे फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहाणे करीत आहेत.

 

Back to top button