पुणे : पत्नीलाच लावले वेश्याव्यवसायाला; पोलिसांच्या रेडची दाखवत होता भीती | पुढारी

पुणे : पत्नीलाच लावले वेश्याव्यवसायाला; पोलिसांच्या रेडची दाखवत होता भीती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पत्नीलाच वेश्याव्यवसायाला लावल्याचा संताजनक प्रकार उघडकीस आला आहे. ‘एका पबमध्ये दोघांची ओळख झाली. लग्न करतो असे सांगून तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर तेच व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने त्याने तरुणीला वेश्याव्यवसायाला लावले. तरुणी पोलिसांत जाईल या भीतीने तिच्यासोबत लग्नदेखील केले; असा प्रकार सुरू ठेवल्याची घटना वडगाव शेरी परिसरात उघडकीस आली आहे.

घरी सांगण्याची व पोलिसांच्या रेडमध्ये अडकवण्याची धमकी देऊन तो संबंधित तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. याप्रकरणी, एका 30 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2016 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत वडगाव शेरी, गोवा, बेंगलोर, सिंगापूर येथे घडला आहे. फिर्यादी तरुणी मुळची कोलकात्याची आहे. शहरातील एका पबमध्ये 2016 मध्ये दोघांचा परिचय झाला होता. ओळख वाढल्यानंतर लग्नाच्या आमिषाने आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तरुणीला गोवा येथे चार दिवस पाठवले. तेथे जबरदस्तीने त्या व्यक्तीसोबत शरीरसंंबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान फिर्यादी पोलिसांत जाऊ नये यासाठी लग्नदेखील केले. फिर्यादी या वेश्याव्यवसाय करतात, असे त्यांच्या घरी सांगण्याच्या व पोलिसांच्या रेडमध्ये अडकविण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या व्यक्तीसोबत त्यांना बेंगलोर, गोवा तसेच सिंगापूर येथे पाठवून देऊन वेश्याव्यवसाय करून घेतला.

आरोपीने फिर्यादींना मित्राच्या रूमवर ठेवले होते. त्यावेळी त्या पतीकडून गर्भवती राहिल्या असता, त्याने औषध देऊन त्यांचा गर्भपात घडवून आणला. दरम्यान, फिर्यादी या पोलिसात तक्रार करतील म्हणून त्याने आळंदी येथे लग्न केले. त्यानंतरदेखील तो त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. तसेच फिर्यादी तरुणीची शारीरिक पिळवणूक करत होता. त्यामुळे फिर्यादीने चंदननगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पती व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button