पुणे : ठग शांतनूचे कारनामे सुरूच; लग्न करून तरुणीच्या नावावर काढले 16 लाख रुपयांचे कर्ज | पुढारी

पुणे : ठग शांतनूचे कारनामे सुरूच; लग्न करून तरुणीच्या नावावर काढले 16 लाख रुपयांचे कर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा: दिवसेंदिवस ठग शांतनूचे फसवणुकीचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. आतापर्यंत त्याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात लग्नाच्या आमिषाने तरुणींसोबत जवळीक साधून कर्ज काढून फसवल्याचे चार गुन्हे दाखल झाले आहेत.
आयटी कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेल्या एका तरुणीसोबत लग्न करून तिच्या नावावर 16 लाख 42 हजार 558 रुपयांचे कर्ज काढल्याचा प्रकार नव्याने समोर आला आहे. त्याने संबंधित तरुणीसोबत लग्नगाठ बांधून संसाराला सुरुवात केली होती.

मात्र, पोलिस इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचले, तेव्हा या तरुणीने आपल्यासोबत असा काही प्रकार झाला आहे का, याची पडताळणी केली, तेव्हा कर्जाचा हा प्रकार समोर आला. या प्रकरणी 32 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शांतनू गजानन महाजन (रा. खराडी, मूळ वाशिम) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्याच्यावर चंदननगर पोलिसात एक, येरवड्यात एक व मुंढवा पोलिसात एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याचा मुक्काम येरवडा कारागृहात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचा आणि शांतनूचा परिचय शादी डॉटकॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर त्याने लग्नाच्या आमिषाने तरुणीला जाळ्यात खेचले. तिच्यासोबत लग्न केले. त्यानंतर त्याने फिर्यादीचे ओळखपत्र व मोबाईलचा वापर करून तिच्या नावे 16 लाख 42 हजार रुपयांचे कर्ज घेतले. दरम्यान, पोलिसांनी अशाच एका गुन्ह्याचा तपास करण्याठी त्याच्या घरी धडक दिली. त्यावेळी हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आला. शांतनूचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्याचे समजते. त्याला उच्चभ्रू राहण्याची सवय असून, अनेक तरुणींची त्याने ठगवणूक केल्याचे पोलिस सांगतात. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

Back to top button