मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला अन्…….. झटक्यात झाला नवीन वाहतूक विभाग | पुढारी

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला अन्........ झटक्यात झाला नवीन वाहतूक विभाग

संतोष शिंदे : पिंपरी : मुंबई- बंगळूर महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांचा ताफा अडकून पडला. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. शनिवारी (दि. 28) सकाळी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी भेट देत रस्त्याची पाहणी केली. दरम्यान, चांदणी चौक परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अधिकारी कर्मचार्‍यांची नियुक्ती करून तत्काळ कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी मुंबई-बंगळुरू महामार्गावर ट्रक बंद पडल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांचा ताफा काही वेळ अडकून पडला.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचार्‍यांच्या मदतीने बंद पडलेला ट्रक कसाबसा बाजूला काढला. दरम्यान, मुख्यमंत्री अडकल्याचे समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावर गर्दी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी चांदणी चौक परिसरातील नेहमीच्या वाहतूक कोंडीचे गार्‍हाणे मांडले.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभाग प्रमुखांना फोन करून तत्काळ कोंडी सोडवण्याबाबत सूचित केले. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी सकाळी लवकरच चांदणी चौक परिसरात दाखल झाले. त्यांनी पाहणी करून लेनची संख्या वाढवणे, जुना पूल पाडणे, महामार्गावरील कामांना गती देण्यावर संबंधितांशी चर्चा केली. दरम्यान, सायंकाळी अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक, बावधन, सूस, म्हाळुंगे, या राधा चौकापासून पुढील परिसरासाठी एक स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करण्याचे आदेश दिले. त्यासाठी दोन सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि 25 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी येथे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. उद्यापासून सोमवार (दि. 29) नवीन वाहतूक विभागाचे कामकाज सुरू होईल.
– आनंद भोईटे, उपायुक्त, वाहतूक विभाग.

 

ताफा अडकल्याचे स्थानिकांच्या पथ्यावर
महामार्गावर मुख्यमत्र्यांचा ताफा अडकल्यानंतर सर्व विभाग खडबडून जागे झाले. मात्र, यापूर्वी स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी कित्येकदा मागणी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडकल्याचे स्थानिकांच्या पथ्थ्यावर पडल्याचे बोलले जात आहे.

Back to top button