रिक्षाचालकांना मोठा दिलासा! रिक्षा भाड्यात 4 रुपयांनी वाढ, 1 सप्टेंबरपासून निर्णय होणार लागू | पुढारी

रिक्षाचालकांना मोठा दिलासा! रिक्षा भाड्यात 4 रुपयांनी वाढ, 1 सप्टेंबरपासून निर्णय होणार लागू

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सीएनजीच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभुमीवर रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) ने रिक्षा चालकांची नुकतीच भाडेवाढ केली आहे. त्यानुसार रिक्षा चालकांना आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी 4 रूपये तर त्या पुढील प्रति एक किलोमीटरसाठी 3 रुपये भाडेवाढ करता येणार आहे. ही दरवाढ पुणे शहर व पुणे जिल्हा भागात लागू होणार आहे. ही नवी भाडे वाढ येत्या 1 सप्टेंबर 2022 रोजीपासून लागू होणार आहे. शासनाकडून मिळालेल्या भाडेवाढीमुळे रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाकाळानंतर ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2021 रोजी भाडेवाढ करण्यात आली होती. आता पुन्हा सीएनजीचे दर 25 टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यामुळे आरटीएकडून ही भाडेवाढ करण्यात आली आहे.

रिक्षाचालकांना पहिल्या दीड किलोमीटरच्या अंतरासाठी 4 रुपये अतिरिक्त आकारता येणार आहेत. तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 3 रुपये आकारता येणार आहे. म्हणजेच रिक्षाचालक पूर्वी पहिल्या टप्प्यातील दीड किलोमीटरसाठी 21 रुपये भाडेदर आकारणी करत होते. आता रिक्षा चालकांना पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी 25 रुपये भाडे आकारता येणार आहेत. तर पुर्वी दीड किमीच्या अंतरापुढील प्रत्येकी एक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते. आता 17 रुपये आकारणे बंधनकारक राहणार आहे.

रिक्षा मीटर रि-कॅलिब्रेशन बंधनकारक…

सर्व रिक्षाचालकांनी ही भाडेवाढ लागू करण्यापूर्वी आरटीओकडून रिक्षा मीटर रि-कॅलिब्रेशन करून घ्यावे. रिक्षा मीटर रि-कॅलेब्रेशन न करताच भाडेवाढ केली, तर संबंधित रिक्षा चालकांवर आरटीओकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

परिसर – रिक्षासंख्या
– पुणे शहर – 82 हजार 523 रिक्षा
– पिंपरी-चिंचवड – 24 हजार 770 रिक्षा
– बारामती – 1 हजार 829
– एकूण रिक्षा संख्या – 1 लाख 9 हजार 129 रिक्षा

रिक्षाचालकांच्या मागणीनुसार आणि सीएनजी दरात झालेल्या 25 टक्के वाढीमुळे रिक्षाचालकांच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 1 सप्टेंबर पासून लागू होईल. मात्र, त्यासाठी रिक्षाचालकांना मीटर री-कॅलिब्रेशन करणे बंधनकारक राहील.
– डॉ. अजित शिंदे, आरटीओ, पुणे तथा सदस्य सचिव, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण

Back to top button