वाघोली : दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त; बकोरी फाट्यावरील समस्या
वाघोली, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नगर महामार्गावरील बकोरी फाटा येथील मोकळ्या जागेत काही व्यावसायिक कचरा टाकत आहेत. तसेच, या ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकणार्यांवर संबंधित विभागाने कारवाई करावी व ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तुषार सातव यांच्यासह नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. बकोरी गावकडून पुणे-नगर महामार्गाला रस्ता जोडला गेला आहे. या रस्त्यावर बीजेएस महाविद्यालय, सोसायट्या, अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांसह वाहनांची वर्दळ असते.
खाद्यपदार्थांची दुकानेसुद्धा याठिकाणी आहेत. त्यातच शैक्षणिक संस्था असल्याने वाघोली परिसरातील विद्यार्थी व नागरिक या ठिकाणी ये-जा करतात. यामुळे प्रवाशांची वाहतूक करणारी खासगी वाहने या ठिकाणी थांबतात. त्यामुळे हे ठिकाण नेहमी नागरिकांनी व वाहनांनी गजबजलले असते. मात्र, याठिकाणी ड्रेनेज लाइनअभावी दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे. तसेच खाद्य पदार्थ व अन्य व्यावसायिक या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. सध्या पावसाळा सुरू असून, अनके साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महापालिकेच्या वाघोली संपर्क कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक श्रीपाद महाजन म्हणाले, की या भागाची लवकरच पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, कचरा टाकणार्यांवरदेखील कारवाई करण्यात येईल.

