पुणे : सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन कधी? आ. टिंगरे यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न | पुढारी

पुणे : सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन कधी? आ. टिंगरे यांनी विधानसभेत उपस्थित केला प्रश्न

येरवडा, पुढारी वृत्तसेवा:  सिद्धार्थनगरमधील नागरिकांच्या पुनर्वसनाकडे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यांना गेल्या 14 वर्षांपासून घरे मिळाली नाहीत. त्यांना घरे कधी देणार, असा प्रश्न वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी गुरुवारी (दि. 25) विधानसभेत उपस्थित केला. टिंगरे म्हणाले, की 2008-2009मध्ये शहरात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी लोहगाव विमानतळ ते नगर रस्ता दरम्यानच्या मार्गांचे रुंदीकरण करण्यात आले. यासाठी महापालिका प्रशासनाने पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊन परिसरातील नागरिकांची 138 घरे व 15 दुकानांची जागा संपादित केली होती. त्यानंतर आता 14 वर्षे उलटूनदेखील या नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. पुनर्वसनासाठी नागरिक महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडेहेलपाटे मारत आहेत. परंतु, त्यांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. या लोकांचा वनवास कधी संपणार? हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला व त्यांना लवकर घरे देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टिंगरे यांनी लोहगाव परिसरातील पोरवाल रस्त्यावरील वाहतूक समस्येचा मुद्दाही विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, ‘पोरवाल रस्त्याला दोन पर्यायी रस्ते आहेत. परंतु, महापालिका प्रशासनाकडून संबंधित रस्त्यांचा विकास करण्यात न आल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेची रस्त्यात गाडीमध्ये प्रसूती झाली आहे. लोहगावचा महापालिकेत समावेश झाला आहे. परंतु येथील समस्या जशाच्या तशा आहेत. वाहतूक कोंडीची समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी विधानसभेत केली आहे.’

 

Back to top button