अखेर शेळगाव ते चौपन्न फाटा रस्त्याच्या कामाला सुरुवात | पुढारी

अखेर शेळगाव ते चौपन्न फाटा रस्त्याच्या कामाला सुरुवात

शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाच्या शेळगाव, तेलओढा ते चौपन्न फाटा या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. दुरुस्तीसाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रस्त्यावर मोजता येत नाहीत एवढे मोठमोठे खड्डे पडले होते. पावसानंतर खड्ड्यात पाणी साठून डबकी होत होती. डबक्यांतून प्रवास करताना अपघात होत होते. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.

रस्ता कामासाठी 11 कोटींचा निधी मंजूर असूनही ठेकेदाराने कामाला सुरुवात केली नव्हती. रस्ताच्या दुरवस्थेकडे प्रशासन व पुढार्‍यांचे दुर्लक्ष असल्याबदल दै. पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्तांनतर संबंधित ठेकेदाराला जाग आली असून त्याने रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली आहे. सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडेझुडपे काढून स्वच्छता केली आहे.

काम सुरू झाल्यावर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पर्यायी रस्त्याची सोय करण्याचे काम सुरू आहे. इंदापूर- बारामती संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील चौपन्न फाटा, तेलओढा, शेळगाव, कळस व डाळज फाटा येथे पुणे- सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारा हा दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. अहोरात्र वाहतूक सुरू असते, मात्र रस्त्याची दुरवस्था झाली होती. म्हणून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शेळगाव तेलओढा ग्रामस्थांनी केली होती.

Back to top button