वेल्हे-नसरापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात | पुढारी

वेल्हे-नसरापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या वेल्हे- नसरापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर सुरुवात केली आहे, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आंबवणे, करंजावणे, मार्गासनीसह दापोडे ते वेल्हेदरम्यान खड्ड्यांत पावसाचे पाणी साठुन डबकी, राडारोडा साठला आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन धानेप (ता. वेल्हे) येथील युवकाचा मुत्यू झाला होता, याकडे नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय संकपाळ म्हणाले,‘गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे. आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. खडी, मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजवण्यात येत आहेत. रस्त्यावर साठणारे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला गटारे स्वच्छ केली जात आहेत.

दोन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.’ दरम्यान, वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणागडावर तसेच मढे घाट, केळद, गुंजवणी परिसरात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजगड भागात जाणार्‍या दापोडे फाटा खरीव ते वाजेघर रस्त्याची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. तसेच ठिकठिकाणी रस्ता खचला आहे, त्यामुळे पायी येणार्‍या विद्यार्थांसह नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

Back to top button