..भय इथले संपत नाही ! ‘भीमा’काठी बिबट्यांची वाढती संख्या शेतकरी, ग्रामस्थांसाठी डोकेदुखी | पुढारी

..भय इथले संपत नाही ! ‘भीमा’काठी बिबट्यांची वाढती संख्या शेतकरी, ग्रामस्थांसाठी डोकेदुखी

राजेंद्र खोमणे

नानगाव : दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांत दिवसेंदिवस बिबट्यांची दहशत वाढत चालली आहे. पाळीव जनावरांवर होणारे हल्ले, शेतामध्ये होणारे बिबट्यांचे दररोजचे दर्शन, यामुळे या भागात चांगलीच दहशत निर्माण झाली असून, दिवसेंदिवस भय वाढतच चालले आहे. भीमा नदीकाठच्या गार, कानगाव, हातवळण, नानगाव, पारगाव सा.मा. (ता. दौंड) तसेच नदीकाठच्या शिरूर तालुक्यातील गावांमध्येदेखील बिबट्यांचा वावर वाढत चालला आहे. मोठ्या बिबट्यांसह छोटे बछडेदेखील वावरताना दिसत आहेत.

आडोशासाठी उसाची शेती, पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी जनावरे या तीनही गरजा पूर्ण होत असल्याने या भागात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. बागायती भाग असल्याने बारमाही शेतात उसाचे पीक उभे असते, त्यामुळे बिबट्यांना आडोसा मिळतो. याच आडोशाला बिबटे छोट्या बछड्यांना जन्म देतात व बछड्यांना मोठे करतात. शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असल्याने शेतकर्‍यांच्याकडे छोटी मोठी जनावरे असतात.

बरेचसे शेतकरी शेतात व वस्तीवर राहायला असल्याने अशा भागातील जनावरांवर रात्रीच्या वेळी बिबटे हल्ला करतात. हल्ल्याचे वाढते प्रमाण पहाता काही शेतकर्‍यांनी गोठे बंदिस्त केले आहेत, मात्र ज्यांच्याकडे मोकळे गोठे आहेत अशा ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढत चालले आहेत. चरण्यासाठी बाहेर पडणार्‍या शेळ्या, मेंढ्यावरही हल्ले होत आहेत, त्यामुळे या भागात आलेल्या मेढपाळांना जरा जपूनच आपल्या जनावरांची देखरेख ठेवावी लागत आहे.

रानातील डुक्कर, कुत्रे अशा प्राण्यांवरही बिबटे हल्ले करत आहेत. रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांना अनेकदा शेतामध्ये जावे लागते. तसेच वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना अनेकदा रात्री अपरात्री कामानिमित्त जावे लागते अशावेळीदेखील बिबट्यांचे दर्शन होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतातील पाण्याच्या कामानिमित्त जाताना जीव मुठीत धरून व बरोबर कोणालातरी घेतल्याशिवाय जाता येत नाही. इतकी भीती सध्या या भागात असल्याने बिबट्यांचे भय मात्र संपत नाही.

Back to top button