निमोणे : आ. पाचर्णे पर्वाच्या अस्तानंतर शिरूर पंचक्रोशीत नेतृत्वाची पोकळी | पुढारी

निमोणे : आ. पाचर्णे पर्वाच्या अस्तानंतर शिरूर पंचक्रोशीत नेतृत्वाची पोकळी

बापू जाधव

निमोणे : दिवंगत रसिकलाल धारीवाल व शहिदभाई पठाण यांची कर्मभूमी असणार्‍या शिरूर शहरातही पाचर्णे यांनी स्वतःच्या नेतृत्वाची मोहोर उमटवली होती. शिरूर तालुका असो की शिरूर-हवेली मतदारसंघ बाबूराव काशिनाथ पाचर्णे म्हणजे ‘बीकेपी’ला मानणारे कार्यकर्ते प्रत्येक गावोगाव पाहायला मिळतात. पाचर्णे यांना मानणार्‍या कार्यर्त्यांनी पक्ष कधी बघितलाच नाही. ‘पाचर्णे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ या विचारावर श्रध्दा ठेवून तब्बल सहा पंचवार्षिकला वेगवेगळ्या चिन्हांवर त्यांनी पाचर्णे यांची पाठराखण केली.

भाजपचे कमळ चिन्ह घेऊन पाचर्णे यांनी दोनवेळा विधानसभेचा गड सर केला. मात्र, या विजयातही ‘बीकेपी’ पॅटर्न निर्णायक ठरला, हे कुणीही नाकारू शकत नाही. पाचर्णे भाजपचे उमेदवार नसताना 99 साली भाजपची गाडी 20-25 हजार, तर 2009 साली 35/36 हजारांच्या पुढे गेलेली कधी दिसलीच नाही. पाचर्णे सोडून राजकारण, ही कल्पनाच न केलेल्या समर्थकांची नौका सद्यघडीला अथांग सागरात भरकटलेल्या नावेसारखी झाली आहे. मागील सहा पंचवार्षिकला सुरुवातीस माजी आमदार पोपटराव गावडे व नंतर आमदार अशोक पवार या दोघांशीही पाचर्णे यांच्या तीन-तीन लढती विधानसभेला झाल्या.

दोनवेळा विजय, तर तीनवेळा पराभव पदरात पडला; तरी पाचर्णे यांनी लोकांच्यात मिळून-मिसळून वागण्याची पध्दत कधी सोडली नाही.
बाबूराव पाचर्णे असो की विद्यमान आमदार अशोक पवार, या दोघांचीही जडणघडण शिरूर शहर असो की तालुक्याचा पूर्व भाग, याच परिसरात घडली. आज पाचर्णे यांच्या अकाली जाण्याने नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दुसरा बाबूराव घडण्यासाठी तब्बल चाळीस वर्षे मातीत गाडून घ्यावे लागेल. वैयक्तिक सुखापेक्षा जनतेचे अश्रू पुसण्यासाठी सर्वस्वाची होळी करण्याची मानसिकता विकसित करावी लागेल. जात-धर्म, गरीब-श्रीमंत हा भेद न करता फाटक्या माणसाच्या गळ्यात हात टाकून त्याच्या व्यथा जाणून घेण्याची मानसिकता उरी बाळगावी लागेल. आजतरी शिरूर पंचक्रोशी असो की तालुका, बाबूराव पाचर्णे यांची जागा घेईल असे नेतृत्व त्यांच्या गोटात दिसून येत नाही.

Back to top button