पुणे : इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू | पुढारी

पुणे : इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

पुणे : काम सुरू असलेल्या इमारतीवरून पडल्याने एका सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाला. संदीप रामकिशन कुमार (वय 28, रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह, इमारतीच्या मालकावर मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास निगडेनगर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी येथे घडली. सुरेश तुळशीराम कसबे (रा. गोपाळपट्टी टकलेनगर), रघु माणिक्कम जाधव (रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी), अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप याचा भाऊ आदित्य रामकिशन कुमार (वय 22, रा. उत्तर प्रदेश) याने फिर्याद दिली.

संदीप कुमार हा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर सेंट्रिंगचे काम करत होता. दुसर्‍या मजल्यावरून पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे कडेला लावलेल्या फळ्या कटावणीच्या साह्याने काढत असताना तो खाली पडला. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या वेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची साधने न पुरविता हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे संदीप याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी काटे तपास करीत आहेत.

Back to top button