पुणे : महामार्गावर ट्रक बंद पडल्याने अडकला मुख्यमंत्र्यांचा ताफा | पुढारी

पुणे : महामार्गावर ट्रक बंद पडल्याने अडकला मुख्यमंत्र्यांचा ताफा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू महामार्गावर ट्रक बंद पडल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनांचा ताफा काही वेळ अडकून पडला. त्यामुळे स्थानिक पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. ही घटना शुक्रवारी (दि. २६) रात्री साडेआठच्या सुमारास चांदणी चौकाजवळ घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी सायंकाळी मुंबईवरून साताऱ्याकडे निघाले होते. दरम्यान, चांदणी चौक येथे रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत मुखमंत्र्यांची वाहने देखील अडकून पडली. याबाबत माहिती मिळताच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी बंद पडलेला ट्रक कसाबसा बाजूला काढला.

दरम्यान, मुख्यमंत्री अडकल्याचे समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावर गर्दी केली. मुख्यमंत्र्यानी देखील गाडीची काच खाली घेऊन नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. मागील काही वर्षांपासून चांदणी चौक परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

ट्रक बंद पडल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकला होता. मात्र, काही मिनिटातच बंद पडलेला ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
– आनंद भोईटे, उपायुक्त, वाहतूक विभाग

 

Back to top button