पुणे : पर्यटकांना खुणावतोय बनेश्वरचा धबधबा | पुढारी

पुणे : पर्यटकांना खुणावतोय बनेश्वरचा धबधबा

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा : बनेश्वर पर्यटन क्षेत्राशेजारील डोंगर निसर्गसौंदर्याने नटलेला असून, जोरदार पावसामुळे डोंगररांगांतून अनेक धबधबे कोसळत आहेत. फेसाळत्या पाण्यासह कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

सातारा-पुणे महामार्गावर पुण्यापासून वेल्हेकडे जाताना 30 किमी अंतरावर नसरापूर हद्दीत बनेश्वर वनोद्यान असून, येथील शिवगंगा नदीतीरावर धबधबा लागतो. यंदा पावसाने सुरुवातीपासूनच मुसळधार कोसळून शिवगंगा खोर्‍याला झोडपले. त्यामुळे परिसरातील तलाव, ओढे, नाले तसेच धबधबे तुडुंब भरून वाहत आहेेत. बनेश्वर येथील फेसाळयुक्त पाण्याचा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे.

नसरापूर (ता. भोर) बनेश्वर येथील शंभू महादेव मंदिरात दर्शनानंतर वनोद्यानातील विविध रंगी निसर्गाचा आनंद लुटता येतो. तसेच जोरदार पावसामुळे धबधबा पांढर्‍याशुभ्र फेसाळयुक्त रंगात वाहत आहे. धबधब्याच्या आजूबाजूला हिरवेगार मनमोहक निसर्गाने हिरवी शाल पांघरल्याचे दृश्य पाहायला मिळते. पक्ष्यांच्या वेगवेगळ्या स्वरांचा किलबिलाट, बहरलेली वृक्षवल्ली, धबधब्यातील पाण्याचा खळखळाट आवाज, यामुळे पर्यटक देहभान विसरतात. सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा पाहण्यासाठी नदीतीरावर जाण्यास बंदी असल्याने उभ्या केलेल्या आरसीसी छतावरून पर्यटक धबधब्याचा आनंद लुटतात.

Back to top button