पुणे : कठडे पडल्याने पूल धोकादायक | पुढारी

पुणे : कठडे पडल्याने पूल धोकादायक

शेळगाव, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील शेळगाव तेलओढा येथे निरा डावा कालव्यावरील पुलाचे संरक्षक कठडे पडून तो धोकादायक झालेला आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूचे तुटलेल्या कठड्यांच्या पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही कोणीही लक्ष देत नसल्याने येथील ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

या धोकादायक पुलावरून अहोरात्र अवजड वाहनाने शेतीमालाची तसेच प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. पुलाच्या नजीकच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या पुलावरून लहान मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शालेय मुले व पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पुलाच्या संदर्भात दै.‘पुढारी’ ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते, परंतु पुलाच्या दुरुस्तीकडे अद्यापही ना तालुक्याच्या प्रमुखांनी लक्ष दिले, ना स्थानिक राष्ट्रवादीच्या व भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी. जलसंपदाच्या अधिकार्‍यांनी फक्त दैनिकात बातमी प्रसिद्ध होताच पुलाची पाहणी करण्यापलीकडे दुसरे काहीच काम केले नाही.

Back to top button