हडपसर ते उरुळी कांचनपर्यंत दुमजली उड्डाणपुलाची मागणी

हडपसर ते उरुळी कांचनपर्यंत दुमजली उड्डाणपुलाची मागणी
Published on
Updated on

उरुळी कांचन/लोणी काळभोर: पुढारी वृत्तसेवा : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सातत्याने सुरू असलेली अपघात मालिका तसेच वाहतुकीच्या प्रश्नासहित महामार्ग सुरक्षिततेवर तोडगा म्हणून हडपसर 15 नंबर ते उरुळी-कांचनपर्यंत दोनमजली इलिव्हेटेड उड्डाणपूल तसेच त्यावर भविष्यात तरतूद म्हणून मेट्रो पुलाची बांधणीसाठी केंद्रीय वाहतूूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली आहे, असे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. हडपसरहून सोलापूर महामार्गावरील चालू अवस्थेतील अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचनाही कोल्हे यांनी पुणे- सोलापूर रस्त्याची पाहणी करताना अधिकार्‍यांना केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान महामार्गाची दुरवस्था, सातत्याने होणारे अपघात व स्थानिक दुरवस्थेचा मुद्दा चर्चेत आल्याने खा. कोल्हे यांनी पुणे – सोलापूर महामार्गावरील या दुरवस्था झालेल्या टप्प्याची पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत केली आहे. त्यानंतर त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधून माहिती दिली. खा. कोल्हे म्हणाले, कवडीपाट ते कासुर्डीदरम्यान चौपदरीकरणाची टोल वसुलीची मुदत संपल्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग होण्यास उशिर झाला, ही बाब खरी आहे.

त्यामुळे महामार्गाची देखभाल व दुरुस्ती होण्यास वेळ खर्ची झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग झाल्यानंतर रस्त्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक दुरुस्त्या करण्याचा प्रस्ताव तयार आहे. या महामार्गावरील लोकसंख्या वाढताना रस्ता क्रॉसिंग करून वाहने चालविणार्‍यांची संख्या अधिक असल्याने या ठिकाणी रम्बलर स्ट्रीपसारखी उपाययोजना करण्यात येईल. तसेच येत्या 15 दिवसांत या मार्गावरील आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे कोल्हे यांनी सांगितले. पत्रकारांनी उरुळी-कांचनपर्यंत मेट्रोचा पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून विचारणा केली असता, पीएमआरडीए आराखड्यात उरुळी-कांचनपर्यंत मेट्रो वाढवावी, अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

नवीन महापालिका
पूर्व हवेली तालुक्यासाठी हडपसर व पूर्व हवेलीतील गावे मिळून महापालिका करण्यासाठी आ. चेतन तुपे व इतर आमदार प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे या भागात नवीन महापालिका करण्याचा प्रस्ताव पुढे जाईल. नगरपंचायत व नगरपरिषदा अस्तित्वात आणण्याचा विचार होणार नाही, असा खुलासा खा. अमोल कोल्हेंनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news