हिंजवडी नगर परिषद करा : आमदार थोपटे | पुढारी

हिंजवडी नगर परिषद करा : आमदार थोपटे

हिंजवडी : हिंजवडी आयटीनगरीच्या विकासासाठी आणि येथील गावांचे वेगळपण जपण्यासाठी हिंजवडीसह माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई या गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी विधानसभेत केली आहे. पिंपरी चिंचवड व पुणे शहरालगतची अनेक गावे पालिकेत समाविष्ट होत आहेत. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडी परिसरातील काही गावे केवळ आयटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याचा घाट घालण्यात येत आहे. ही गावे महापालिकेत न घेता या गावांची मिळून एक नगर परिषद करा, अशीही मागणी होत आहे.

येथील ग्रामपंचायतीनी तसा ठरावदेखील यापूर्वी दिला आहे, याचे सूतोवाच त्यांनी या वेळी केले. त्यामुळे हे समाविष्ट गावाचे घोंगडे तसेच भिजत पडले आहे. त्यावर कोणताही तोडगा निघत नाही. पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार थोपटे म्हणाले, की हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई या गावांमध्ये वाढत्या शहरीकरणासाठी एक स्वतंत्र ‘क’ वर्ग दर्जाची नगर परिषद तयार करण्यात यावी करण्यात यावी. याबाबतचा ठरावदेखील करण्यात आला आहे.

तसेच, शासनानेही या बाबतचा अभिप्राय सरकारकडे मागविला आहे. तर त्यातील काही ग्रामपंचायतींनी ही गावे महापालिका क्षेत्रातच घ्यावीत असा देखील दुसरा ठराव दिला आहे. येथील विकासासाठी काय महत्वाचे आणि त्यास किती कालावधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, येथील भागात विकासाच्या बाबतीत अनियमितता आढळून येत आहे. तसेच रस्ते, अनधिकृत बांधकामे, औद्योगिकरण असे विषय गंभीर होत आहे. यामुळे याबाबतचे निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Back to top button