चाकणला कंटेनरखाली चिरडून पादचारी ठार; दोघे गजाआड | पुढारी

चाकणला कंटेनरखाली चिरडून पादचारी ठार; दोघे गजाआड

चाकण; पुढारी वृत्तसेवा: कंटेनरच्या चाकांखाली चिरडून पादचारी इसमाचा मृत्यू झाला. चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले आहे.
या अपघातात ठार झालेल्या इसमाची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. नाशिक बाजूकडून आलेला कंटेनर (क्र. आरजे 23 जीबी 7039) तळेगाव चौकात वळून शिक्रापूर बाजूकडे जात होता.

त्यावेळी वाहतूक पोलिसांच्या चौकातील निवारा केंद्राच्या समोर अनोळखी पादचारी इसम या कंटेनरखाली चिरडला गेला. चाके अंगावरून गेल्याने छिन्नविछिन्न झालेल्या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अवघड झाले. याबाबत कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती. दरम्यान, वडगाव- तळेगाव- चाकण- शिक्रापूरदरम्यान अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी आणि अपघातप्रवण ठिकाणे असल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्याचे काम लालफितीत अडकले असून ते सुरू करण्याची मागणी होत आहे.

Back to top button