

पिंपरी : पोलिस भरती परीक्षा घोटाळ्यातील 56 जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. यातील विशेष बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींपैकी 31 जण सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरले होते. त्यांना पोलिस प्रशिक्षण केंद्रात पाठवण्याची तयारीदेखील झाली होती. मात्र, पोलिसांना वेळीच कुणकुण लागल्याने मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला. नाहीतर आगामी काळात 'त्या' 31 भामट्यांचा पोलिस दलात सहभाग झाला असता. याबाबत सविस्तर वृत्त असे, की पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात नोव्हेंबर 2021 मध्ये 720 पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
जानेवारी 2022 पर्यंत ही भरती सुरू होती. यामध्ये तब्बल एक लाख 89 हजार तरुणांनी सहभाग घेतला होता. या पदांसाठी पुणे, सोलापूर नागपूर, औरंगाबाद, बारामती, नाशिक आणि अहमदनगर येथे लेखी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये दहा हजार 900 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते. यातून 720 पदांसाठी उमेदवार निवडण्यात आले. दरम्यान, भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर या घोटाळ्यात सहा टोळ्यांतील 121 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी राज्यभर सापळे रचून 56 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 76 मोबाईल, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, 22 वॉकीटॉकी संच, 11 वॉकीटॉकी चार्जर, 11 लाख रुपये रोख रक्कम असे भलेमोठे घबाड जप्त केले. तसेच, आरोपींकडून डिव्हाईस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कपडे, सिमकार्डस, कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी 65 आरोपींचा शोध सुरू आहे.