जावेद मुलाणी
इंदापूर : इंदापूर तालुक्यात नुकतेच दोन महिन्यांच्या फरकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून निमसाखर व भरणेवाडीतील दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. तालुक्यात पुन्हा छुप्या सावकारकीने डोके वर काढल्याचे दिसून आले आहे. या सावकारांच्या मुजोरीला मोडीत काढण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, तर नेतेमंडळी भाषणबाजीत गुंग असल्याने यासाठी प्रशासनाला कामाला लावण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. आपल्या दैनंदिन जीवनात संसाराचा गाढा ओढताना, वाढत्या महागाईला तोंड देताना गरज सरेल म्हणून धुणीभांडी, खुरपण, कचरा वेचणार्या महिलेपासून ते अनेक शेतकरी, व्यापारी आणि लहान- मोठे उद्योजकही खासगी सावकाराकडून उसने पैसे घेतात.
मात्र, त्यांच्या व्याजाचा दणका इतका असतो की, कर्जदार त्यातच रूतत जातात. शेवटी कर्ज फिटत नाही आणि सावकाराचा तगादाही संपत नाही, म्हणून अखेर काही जण कर्जबाजारीपणाला व सावकाराच्या तगाद्याला कंटाळून मृत्यूला कवटाळतात तर काहींना सावकाराकडून जिवे मारण्याच्या घटना अलीकडच्या काळात इंदापूर आणि नजीकच्या बारामती तालुक्यात घडू लागल्या आहेत. सध्य:स्थितीत उजेडात आलेले खासगी सावकार हे हिमनगाचे टोक असून, अनेक सावकार राजरोसपणे पैशांच्या जोरावर राजकीय, सामाजिक क्षेत्रात 'व्हॉइट कॉलर' म्हणून धुमाकूळ घालत आहेत.
पैशांची गरज असताना बँकेसाठीचे कागदपत्राअभावी तसेच अटींमुळे तिकडे कानाडोळा केला जातो. परिणामी खासगी सावकारांचे फावते. यातूनच अवाच्या सवा व्याजाची वसुली करून कर्जदारांची पिळवणूक केली जाते. 5 पासून 40 टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी केली जाते. अनेक वेळा कर्जदाराची परिस्थिती पाहून पठाणी व्याजाचा तगादा लावला जातो. पैशांच्या वसुलीसाठी सावकारांकडून महिलांचा आणि गुंडांचा वापर केला जातो. खासगी सावकारांवर कारवाई करू, असे पोलिस यंत्रणा सांगत असली तरी तेवढ्या प्रमाणात कायदा प्रभावी नसल्याने खासगी सावकारकी फोफावू लागली आहे.
इंदापूर तालुक्यातील खेडोपाडी, मोठ्या गावामध्ये शहरातील काही भागातील गल्ली-बोळात,पेठा, व्यापारपेठांत काही गडगंज खासगी सावकार आहेत. किरकोळ विक्रेत्याला सकाळी पाचशे रुपये व्यवसायाला दिले की, रात्री व्यवसाय संपल्यावर त्याच्याकडून सहाशे रुपये गोळा करणारेही काही 'रात्रीस खेळ चाले' असे सावकार आहेत. भिशी, लिलाव भिशी, बचत गटांच्या माध्यमातूनही खासगी सावकारकी फोफावते आहे. मुद्दल न फिटता व्याजानेच कर्जदार घायकुतीला येतो. पाच लाखांपासून कोटी रुपये देणारेही बडे सावकार आहेत.
त्यासाठी कोरा स्टॅम्प, गुंठ्यावारी जमिनी, बंगले, बागायती जमिनी, विहिरी, शेततळे नावावर करून घेतले जातात. दर महिन्याला व्याज वसुलीसाठी जिममधील 'बॉडीबिल्डर पंटर' नेमले जातात. व्याज न दिल्यास संबंधित व्यक्तीच्या घरातील साहित्य फेकून देणे, कर्जदाराला ताब्यात घेऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत, पण कर्जदाराचे हात कागदोपत्री बांधून घेतल्याने ते तक्रार करत नसल्याने व खासगी सावकारांची व काही ठराविक पोलिसांचे लागेबांधे असल्याने खासगी सावकारांची चलती जोरात सुरू आहे.
खासगी सावकारकीची पद्धत
कोरे धनादेश घेणे.
स्थावर मालमत्तेची कागदपत्रे घेणे.
वाहन, अन्य वस्तू ताब्यात घेऊन व्यावसायिक वापर करणे.
सोन्याचे दागिने घेणे.
कर्जदार व त्याच्या कुटुंबीयांना धमकावणे.
महिलांना वसुलीसाठी पाठवणे.
फायनान्स कंपन्या आणि खासगी भिशीच्या आडून सावकारी.
कर्जाच्या बदल्यात शेतकर्यांच्या जमिनीची आपल्या नावे धनादेश, ताबा पावती, गहाणखत, साठेखत, नोटरी, वेळप्रसंगी खुशखरेदीखत करून घेणे.