टाकवे बुद्रुक : अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत पशुवैद्यकीय दवाखाना

टाकवे बुद्रुक : अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत पशुवैद्यकीय दवाखाना

टाकवे बुद्रुक : पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पशुवैद्यकीय दवाखान्यात टाकवे बुद्रुक, घोणशेत, खरमारवाडी, देशमुखवाडी, कचरेवाडी, वाउंड, साई, नानोली, पारुडी, फळणे आदी गावांतील नागरिक आपल्या जनावरांच्या तपासणीसाठी येत असतात. मात्र, येथे रूजू असलेले पशु अधिकारी दवाखान्यात येतच नाही; पण दवाखाना महिन्यातून एक -दोन वेळा साफसफाईसाठी येथील कर्मचारी उघडत असतात. कर्मचार्‍यांना अधिकारी केव्हा येणार असे विचारले असता ते उडवाडवीची उत्तरे शेतकर्‍यांना देतात. सध्या परिसरात कवळ्या चार्‍यापासून ताप, जुलाब, लाळ गळणे, घटसर्प, कुरकुद आदी आजार उद्भवत आहेत.

जनावरे आजारी पडण्याची संख्याही वाढत आहे. येथे शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
शेतकर्‍यांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. परंतु, यासाठी त्यांना जास्त पैसे ही मोजावे लागत आहेत. यावर्षी पाऊस सुरू होण्याआधी शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातून कोणत्याही गावात पावसाळ्याच्या सुरुवातीला रोगप्रतिकार डोस जनावरांना दिला नाही. यामुळे परिसरात जनावरे आजारी पडण्याची संख्या वाढली आहे.

या परिसरात दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणात असल्याने येथे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांची गरज भासत आहे. वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. संबंधित डॉक्टरांनी रोज हजेरी लावून पशुवैद्यकीय सेवा द्यावी किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांनी नवीन पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा याची तक्रार जिल्हा पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडे केली जाईल, असा इशारा येथील दुग्ध व्यावसायिकांनी दिला आहे.

टाकवे बुद्रुक येथे पशुवैद्यकीय महिला अधिकारी कार्यरत होत्या. त्या दीड वर्षांपासून परदेशात उच्चशिक्षणासाठी गेल्यामुळे येथील जागा रिक्त झाली आहे. ही जागा भरण्यासाठी आम्ही आमदाराकडे मागणीदेखील केली होती. येथे लवकरच पशु वैद्यकीय अधिकारी नेमण्यात येईल.
                     – अंकुश देशपांडे, पशुवैद्यकीय अधिकारी, मावळ तालुका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news