पिंपरी : स्टेज कलाकारांना गणेशोत्सवात ‘अच्छे दिन’; नवोदितांना व्यासपीठ | पुढारी

पिंपरी : स्टेज कलाकारांना गणेशोत्सवात ‘अच्छे दिन’; नवोदितांना व्यासपीठ

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गेली दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंध असल्याने मंडळांनी फक्त सजावट व सामाजिक कामे करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने गणेश मंडळांनी जिवंत देखाव्यावर भर दिला आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर स्टेज कलाकारांना यंदा अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे घरगुती गणेशोत्सव, गणेशमंडळे या सर्वांची तयारी जोरात सुरू आहे. यंदा कलाकारांना आणि हौशी कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत आहे.

मंडळांचा सामाजिक, ऐतिहासिक, स्वच्छता, स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि कोरोना महामारी या विषयांवर देखावे सादर करण्याचा कल दिसून येत आहे. त्यामुळे नाट्य दिग्दर्शक, कलाकार यांची बसविलेल्या स्किटवर सराव सुरू आहे.

देखाव्यातून आर्थिक उलाढाल
शहरात जवळपास 100 हून अधिक मंडळे जिवंत देखावे सादर करतात. नवोदित पाचशे ते साडेपाचशे रुपये मानधन मिळते. मंडळांच्या बजेटवर कलाकारांचे मानधन ठरलेले आहे. तसेच स्किटमध्ये साकारत असलेल्या पात्रानुसार मानधन ठरते. मुख्य भूमिकेसाठी जास्त मानधन दिले जाते. वेशभूषा, मेकअप, नेपथ्य यांवर देखील खर्च केला जात आहे. त्यामुळे जिवंत देखावा सादर करणारी मंडळे लाखोचा खर्च करत आहेत.

हौशी कलाकारांना संधी
हौशी कलाकारांना नाटकात काम करायचे झाल्यास नाट्यसंस्थाकडे ऑडिशन द्यावी लागते. त्यात यशस्वी झाली तर काम मिळते. मात्र, जिवंत देखाव्यात तशी काही अट नसते. याठिकाणी व्यक्ती हौशी कलाकार (नॉनआर्टिस्ट) असली तरी हरकत नसते. अशा कलाकाराला दिग्दर्शक संधी देवून त्याच्याकडून काम करवून घेतो.

Back to top button