बाणेर : मोहल्ला कमिटीतील समस्या गांभीर्याने घ्या; अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचा नागरिकांचा आरोप | पुढारी

बाणेर : मोहल्ला कमिटीतील समस्या गांभीर्याने घ्या; अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचा नागरिकांचा आरोप

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या मोहल्ला कमिटी बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या समस्या अधिकारीवर्ग गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. समस्यांचे गांभीर्य ओळखून अधिकार्‍यांनी त्या लवकरात लवकर सोडवाव्यात, असा रोष नागरिकांनी या बैठकीत व्यक्त केला. औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने बाणेर मुख्य रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत असून मुख्य रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

त्याचबरोबर पदपथावर असलेल्या इंटरनेटच्या केबल, क्रॉसवर्ड औंधसमोरील पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण, कचरा व्यवस्थापन, पत्र्याच्या शेडमधील होणारी अतिक्रमणे व व्यावसायिकांकडून हप्ते घेऊन दिले जाणारे अतिक्रमणांना संरक्षण, औंध नदी किनार्‍यावरील डुकरांचा प्रश्न आधी समस्या या बैठकीत नागरिकांनी मांडल्या. संबंधित समस्या वारंवार सांगूनदेखील काहीच होत नसल्याची खंतही या वेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

या बैठकीचा अहवाल ठेवून पुढील महिन्यात होणार्‍या बैठकीमध्ये अधिकार्‍यांनी यातील कोणते प्रश्न सुटलेत याचा अहवाल देण्यात यावा, अशी मागणीही उपस्थित नागरिकांनी सहायक आयुक्त संदीप खलाटे यांच्याकडे केली. या वेळी सचिन वाडेकर, वैशाली पाटकर, गणेश कलापुरे, रमेश रोकडे तसेच विविध सोसायटीचे सभासद व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button