पिंपरी : विद्यार्थ्यांच्या गणवेशाला दिवाळीचा मुहूर्त | पुढारी

पिंपरी : विद्यार्थ्यांच्या गणवेशाला दिवाळीचा मुहूर्त

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आणखी दोन महिने गणवेश मिळण्याची चिन्हे नाहीत. गणवेशाबाबत पुरवठा आदेश दिल्यानंतर पुढील दोन महिन्यात हे गणवेश विद्यार्थ्यांना मिळतील, असे महापालिका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. पर्यायाने आता ऑक्टोंबरमध्ये दिवाळीपूर्वीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकणार आहेत. महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना महापालिका शिक्षण विभागाकडून गणवेश दिले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 गणवेश, 1 पीटी गणवेश आणि 1 स्वेटर देण्यात येतो. सुमारे 53 हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

महापालिकेच्या 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा आहेत. जून महिन्यात शाळांना सुरुवात झाली. शाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. विद्यार्थ्यांना सध्या पाठ्यपुस्तके देण्यात आलेली आहे. पावसाळ्याचा एकच महिना शिल्लक असताना अद्याप रेनकोट मिळालेले नाही. त्याशिवाय, विद्यार्थ्यांना बूट, पीटी बूट, सॉक्स, शालेय वह्या, दफ्तर आदींपैकी कोणतेही साहित्य मिळालेले नाही. विद्यार्थ्यांना आता केवळ गणवेश दिला जाणार आहे. अन्य शालेय साहित्याची रक्कम डीबीटीद्वारे विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे नियोजन आहे.

विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी पुरवठा आदेश दिल्यानंतर पुढील दोन महिन्याच्या कालावधीत गणवेश मिळतील. दिवाळीपूर्वी हे गणवेश देण्याचे नियोजन आहे. रेनकोट, बूट, पीटी बूट, सॉक्स, शालेय वह्या, दफ्तर आदींची रक्कम विद्यार्थी किंवा पालक यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात येईल.
     – संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग.

Back to top button