पुणे : विद्यार्थिनीच्या भावी पतीला भरला दम; शिक्षकाने फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: खासगी क्लासच्या शिक्षकाचे आणि त्याच्याकडे शिकवणीसाठी येणार्या विद्यार्थिनीचे प्रेमाचे सुत जुळले असताना तिच्या विवाहाची बातमी शिक्षकाच्या कानावर पडली. त्यानंतर त्याने थेट तिचे लग्न ठरलेल्या भावी पतीलाच फोन करून त्याला जिवे मारण्याची व विद्यार्थिनीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नितीन सुडके ऊर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील (वय 28, रा. गौरीशंकर सोसायटी, हिंगणे खुर्द) या शिक्षकाला अटक केली आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले की, नितीनचा गणिताचा खासगी क्लास आहे.
तक्रारदार तरुणी 9 वीपासून त्याच्याकडे गणित शिकण्यासाठी जाते. यावेळी त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांनी तरुणीच्या कुटुंबाने तिचा विवाह दुसर्या एका मुलाशी ठरविला. ही बाब नितीनला समजली. तरुणीनेदेखील विवाह ठरल्याचे सांगत त्याला प्रेमसंबंध न ठेवण्याबाबत सांगितले. मात्र, तरीही नितीनने त्या दोघांचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तिचा हात धरून विनयभंग केला. सतत फोन करून त्रास दिला. त्यानंतर या तरुणीचे ज्या मुलाशी लग्न जमलेले आहे, त्या मुलाला फोन करून ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.