मळदच्या भोऱ्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, एक वर्षासाठी केले कारागृहात स्थानबद्ध | पुढारी

मळदच्या भोऱ्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, एक वर्षासाठी केले कारागृहात स्थानबद्ध

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती शहर व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आकाश उर्फ अक्षय उर्फ भोऱ्या बापूराव जाधव (वय २७) याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले.

शहरात वारंवार गुन्हे करणाऱ्या, तसेच दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी शहर पोलिसांनी अद्ययावत केली आहे. त्यानुसार तडीपारी, मोक्का अशा कारवाया केल्या जात आहेत. जाधव हा गेल्या दोन वर्षांपासून शहर व परिसरात दहशत माजवत गुन्हे करत होता. वारंवार तुरुंगात जाऊन आल्यानंतरही तो गुन्हे करत होता. त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, खंडणी, मालमत्तेची तोडफोड, नासधूस, मारहाण, शिविगाळ, जीवे मारण्याची धमकी, चोरी, हत्यारासहित लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही त्याची दादागिरी वाढतच चालली होती. लोकांमध्ये तो दहशत निर्माण करत होता. दहीहंडी उत्सवामध्ये आयोजनावरूनही त्याने वादंग केला होता. त्यामुळे त्याला महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्याप्रमाणे स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्फत पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्याकडे सादर केला होता.

देशमुख यांनी त्याचे अवलोकन करत तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जाधव याचा गुन्हेगारी आलेख पाहत या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, युवराज घोडके, देवेंद्र खाडे, संजय जगदाळे, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, अतुल जाधव, दशरथ इंगोले, संजय जाधव, प्रमोद राऊत, बंडू कोठे, तुषार चव्हाण, मनोज पवार, यशवंत पवार आदींनी केली.

बारामती परिसरात गुंडगिरी करणारांना हा इशारा आहे. त्यांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली नाही तर त्यांच्यावरही या प्रमाणे कारवाई होवू शकते. भावनेच्या भरात केलेल्या गुन्ह्यातून मोक्का लागू शकतो.
– सुनील महाडीक, पोलिस निरीक्षक, बारामती शहर

Back to top button