बारामतीत सावकारांकडून व्यावसायिकाला मारहाण, पाचजणांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

बारामतीत सावकारांकडून व्यावसायिकाला मारहाण, पाचजणांविरोधात गुन्हा दाखल

बारामती, पुढारी वृत्तसेवा: व्याजाने घेतलेल्या ४० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख २७ हजार रुपयांची रक्कम आणि ३९ हजार रुपयांचा किराणा नेल्यानंतरही आणखी पैशाची मागणी करणाऱ्या अवैध सावकाराने त्याच्या सहकाऱ्यांसह व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली. या प्रकरणी सावकारासह त्याच्या साथीदारांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुंडलिक काळे, त्यांचा मुलगा अक्षय काळे (रा. निरावागज, ता. बारामती) व अन्य तिघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आंबेडकर स्टेडियमजवळ अभिजित पुष्कराज टाटीया यांचा छोट्याशा गाळ्यात किराणा मालाचा व्यवसाय आहे. २०१८ साली त्यांना व्यवसायासाठी पैशाची आवश्यकता होती. त्यामुळे निरावागजच्या विजय देवकाते यांनी त्याच गावात राहणारे अवैध सावकार कुंडलिक काळे यांच्याबरोबर त्यांची ओळख करून दिली. टाटीया यांनी काळे यांच्याकडून ४० हजार रुपये महिना पाच टक्के व्याजाने घेतले. तारणापोटी बारामती सहकारी बॅंकेचा धनादेश देण्यात आला. टाटिया हे तेव्हापासून दर महिन्याला वेळोवेळी व्याज देत आले आहेत. त्यापोटी आजवर १ लाख २७ हजार रुपये देण्यात आले. याशिवाय काळे यांनी गरज वाटेल तेव्हा दुकानातून आजवर ३९ हजार रुपयांचा किराणा माल नेला. तरीही पैशाची मागणी थांबली नाही.

बुधवार २४ ऑगस्ट रोजी कुंडलिक काळे यांनी टाटिया यांच्या दुकानात येत दोन महिन्याचे दहा हजार रुपये व्याज द्या अशी मागणी केली. मुद्दल, व्याज फिटले असल्याचे उत्तर टाटिया यांनी दिले. त्यावर कुंडलिक याने त्यांचा मुलगा अक्षय याला फोन करत हे लोक व्याज देत नाहीत, तु इकडे ये, असे सांगितले. अक्षय हा अन्य तिघांना घेऊन आला. त्यांनी अभिजित व त्यांचे वडील पुष्कराज यांना कुटुंबियांसमोर दुकानात मारहाण करत पैशाची मागणी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. टाटिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावकारी अधिनियम व मारहाणीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

Back to top button