पिंपरी : पोलिस भरती घोटाळाप्रकरणी आणखी पाच अटकेत | पुढारी

पिंपरी : पोलिस भरती घोटाळाप्रकरणी आणखी पाच अटकेत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिस भरती परीक्षा घोटाळ्यातील आणखी पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अकरा लाखांची रोकड, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, वॉकीटॉकी संच, चार्जर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने औरंगाबाद, जालना आणि बीड येथे ही कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 56 जणांना अटक कऱण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (29, रा. जालना), कार्तिक उर्फ वाल्मिक सदाशिव जारवाल (23, रा. औरंगाबाद), अरुण विक्रम पवार (26, रा. बीड) अर्जुन विष्णू देवकाते (28, रा. बीड), अमोल संभाजी पारेकर (22, रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात नोव्हेंबर 2021 मध्ये 720 पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. जानेवारी 2022 पर्यंत ही भरती सुरू होती. दरम्यान, भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी त्यावेळी 51 आरोपींना अटक केली होती. यातील 26 जण उमेदवार होते. दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून 75 पेक्षा अधिकजण यामध्ये आरोपी असल्याचे तपासात समोर आले.

त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट चारने औरंगाबाद, जालना आणि बीड शहरात सापळा रचून आणखी पाचजणांना नुकतेच अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 76 मोबाईल, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, 22 वॉकीटॉकी संच, 11 वॉकीटॉकी चार्जर, 11 लाख रुपये रोख रक्कम असे भलेमोठे घबाड जप्त केले आहे. तसेच, आरोपींकडून डिव्हाईस लपवून परीक्षेला नेण्यासाठी वापरलेले कपडे, सिमकार्डस, कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. या करवाईमुळे औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात परीक्षांमध्ये गैरप्रकार करणा-या सहा टोळ्या गजाआड झाल्या आहेत.

Back to top button