कर्‍हा पात्रातून धोकादायक प्रवास; आंबी खुर्दच्या विद्यार्थ्यांची रोज कसरत | पुढारी

कर्‍हा पात्रातून धोकादायक प्रवास; आंबी खुर्दच्या विद्यार्थ्यांची रोज कसरत

मोरगाव; पुढारी वृत्तसेवा: नाझरे धरण शंभर टक्के भरल्याने कर्‍हा नदीपात्रात धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्र तुडुंब भरल्याने आंबी बूद्रुक आणि आंबी खुर्द या दोन्ही गावांचा संबंध तुटला आहे. आंबी खुर्द ग्रामस्थांना मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना शाळेसाठी आंबी बुद्रुकला पोहोचवावे लागत आहे.

सोमेश्वर कारखान्याने या ठिकाणी पूर्वी लोखंडी पूल उभारला होता, मात्र दोन वर्षापूर्वीच्या अतिवृष्टीने पुलाची मोडतोड झाल्याने या गावाचे संबंध तुटले आहेत. कारखान्याने हा पूल दुरुस्त केला नसल्याने ग्रामस्थांना मोरगाव, जेजुरी, बारामती या ठिकाणी जाण्यासाठी वीस किलोमीटरचा वळसा घालून खंडूखैरेवाडी मार्गे जावे लागत आहे. शालेय मुलांना यामार्गे आंबी बुद्रुकला येण्यासाठी स्वत:च्या वाहनाने किंवा इतर वाहनाने आंबी बुद्रुकला सोमेश्वर विद्यालयात यावे लागत आहे .

आंबी खुर्दचे सुमारे 150 विद्यार्थ्यांना नदीपात्र ओलांडून सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे नदीपात्रातून मानवी साखळी करून ग्रामस्थ पालक, शिक्षक, शिपाई यांच्यामार्फत या विद्यार्थ्याना धोकादायक पध्दतीने शाळेस यावे लागत आहे. प्रसंगी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा उपयोग करावा लागतो, असे आंबी खुर्दचे उपसरपंच गौरव गाढवे यांनी सांगितले.

सोमेश्वर कारखान्याला या नदीपात्रात सिमेंटचा पाइप टाकून रस्त्याची मागणी अद्याप पूर्णत्वास आली नाही . त्यामुळे नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या निधीतून नवीन पुलाचे काम सुरू आहे. हा पूल पूर्ण होण्यास अवधी लागणार आहे. आंबी खुर्द गावाला समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी सिमेंटटा पाइप टाकून रस्ता करून दिल्यास या गावाची समस्या सुटू शकते.

Back to top button