फलटण रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य; खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी | पुढारी

फलटण रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य; खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी

सांगवी; पुढारी वृत्तसेवा: बारामती- फलटण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होऊन नागरिकांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

गेल्या बारा वर्षांपासून बारामती- फलटण रस्त्याच्या कामाचा प्रश्न जैसे थे आहे. या रस्त्यावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याच्या कामाबाबत राजकीय उदासीनता दिसून येत आहे. सर्वच राजकीय नेत्यांना या रस्त्याचा विसर पडल्याची टीका वाहनचालकांनी केली आहे. राजकीय नेत्यांकडून फक्त आश्वासनापलीकडे दुसरे काहीच ऐकायला मिळत नाही. स्थानिक पदाधिकारीही पाठपुरावा करताना दिसत नाहीत.

अजून किती दिवस या रस्त्याचे घोंगडे भिजत राहणार, असा सवाल या भागातील वाहनचालकांनी केला आहे. या रस्त्यावर पाहुणेवाडी येथील पुलावर, शिरवली हद्दीतील जरांडेवस्ती येथील पुलावर तसेच फलटण तालुक्यातील पवार टेक भागात असंख्य मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डा चुकविताना वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात आदळून अपघात होत आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असल्याने लागलीच दुरुस्ती करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.

Back to top button