पिंपरी : स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू ; 25 जण बाधित | पुढारी

पिंपरी : स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू ; 25 जण बाधित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आकुर्डी येथील एका महिलेचा (वय44) मंगळवारी (दि. 23) स्वाइन फ्लूने (संशयित रुग्ण) मृत्यू झाला. त्यांच्यावर महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. स्वाइन फ्लूने (संशयित रुग्ण) झालेला ऑगस्ट महिन्यातील हा तिसरा मृत्यू आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही दोन स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, आतापर्यंत स्वाइन फ्लूचे 25 बाधित रुग्ण आढळले आहेत.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गंभीर स्वाइन फ्लू रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, अवैद्यकीय कर्मचारी, गरोदर महिला, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले रुग्ण (अति जोखमीचे रुग्ण) यांच्यावर स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे.

आजाराची लक्षणे :  ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी. बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो. तसेच, घसादुखी असणार्‍या बाळांमध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते.

स्वाइन फ्लू तपासणी :  महापालिकेचे पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, ह.भ.प. मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय (नवीन आकुर्डी रुग्णालय), नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी) येथे अतिदक्षता विभागात दाखल असणार्‍या रुग्णांची स्वाइन फ्लू तपासणी केली जात आहे.

Back to top button